शनिवार, २६ एप्रिल, २००८

एक अविस्मरणिय "विचित्र" अनुभव भाग ३

सगळ्यांची इंट्रोडक्शन ची राउंड झाली आणि फी ने आम्हाला पुढचा प्लॅन सांगितला....आम्हाला वाटत होते की आम्ही बँकॉक ला हॉटेल मध्ये जाऊन जरा आराम करणार आणि दुपारी जेवण करून नंतर फिरायला जाणार.... पण सगळं वेगळंच निघालं. आम्ही बस ने डायरेक्ट पत्तया ला जाणार होतो.... हे ऐकल्यावर आम्ही जागीच संपलो.... ३तास बस ने प्रवास.... परदेशात सोयी कितीही चांगल्या असल्या तरी रात्री झोप झालेली नव्हती, आणि त्यात हा वाट्याला आलेला अधिक प्रवास..... नाइलाज या गोष्टीला काही उत्तर नसतं हे कस खरं आहे हे आम्हाला मनोमन पटत चाललं होतं. मध्ये एका ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलो.... नशिबाने जागा चांगली होती..ब्रेड आम्लेट, जॅम चहा कॉफी अस सगळं होत..... मन नाही पण पोट तरी शांत झालं होत.... त्या ठिकाणी एक "टायगर शो" असतो... तुम्हाला पाहायचा असेल तर आपण सोय करू.. असं प ने आम्हाला सांगितले.... सगळ्यांना आनंद झाला.... आणि लगेच ति म्हणाली..."प्रत्येकाचे २५० बाथ" तिकिटाचे होतील".......?????????????????????????????
हे काय???? ह्यांना इतके पैसे काय तिकिट काढायला दिले का???? शो बघायला आम्ही पैसे भरायचे?????
तिने लगेच सांगितलं हा शो आपल्या पॅकेज मध्ये नाहीये,,,, (स्वगत "चला आता असे अनेक शो असतील जे ह्यांच्या पॅकेज मध्ये नाहीत" रोज जाहीरात तर करतात की आमच्या सोबत टूर ला आलात तर तुमच्या शॉपिंग शिवाय काहीही खर्च नाही करावा लागणार...)
२५०बाथ म्हटल्यावर लगेच हिशोब सुरू झाला... ५००बाथ दोघांना.... म्हणजे आपल्याकडे इतके पैसे उरणार..... अजून ८ दिवस आहेत....वगैरे वगैरे.... शेवटी ह्या देशात इतर किती खर्च करावा लागेल ह्याचा अंदाज नसल्याने आणि अजून किती ठिकाणी ही बया पैसे खर्च करायला लावणार आहे ह्याचा विचार करून आम्ही तो शो पाहिलाच नाही.... सफारी वर्ल्ड मध्ये पाहू वाघ .... अस ठरवलं.आणि आमचा सगळ्यांचा पत्तया चा प्रवास सुरू झाला..... दमलेले असल्याने रस्त्यात काय दिसतंय ....ते किती चांगलं आहे ह्याचा आम्ही विचारच करू शकलो नाही.....
रस्ताभर तिने हॉटेल कसे चांगले आहे... आपल्या हॉटेल चा प्रायव्हेट बीच आहे.... रूम मधून तो दिसतो.... खिडकीतलं आणि गॅलरीतून दिसणारं दृश्य किती छान आहे ह्याचं वर्णन केलं..... आम्ही हॉटेल वर पोहोचलो.....साधारण ११ वाजले होते .पुढची सूचना ही की १२.३० ला जेवायला जायचे आहे आणि नंतर एक शो पाहायला... (चला एक तरी शो आहे पॅकेज मध्ये) रूम मिळाली.... पण आराम करायला वेळ नव्हता मिळत.घाईने मी रूमचे दार उघडून गॅलरी गाठली..... पाहते तर काय...... समोर हॉटेल च्या मागच्या विंग ची भिंत आणि खाली संपूर्ण हॉटेल ला गरम पाणी पुरवण्यासाठी लावलेला बॉयलर.......
परत एकदा नाराजी आली..... मला स्वप्नील (माझा नवरा) म्हणाला, आपलं नशीब खराब असेल ति सी फेसिंग रूम दुसय्रा कुणालातरी मिळाली असेल..... हममSSSSSSS जरा रूम मध्ये टेकत नाही तोपर्यंत १२ वाजले.... आणि एक रिमाइंडर कॉल आला..... १२.३० ला खाली भेटण्याचा.... लवकर आवरण्यावाचून पर्याय नव्हता,,, खाली आलो... ५ मिनिटे उशीर झाला.... तर शाळेत जसे वेळा पाळण्याचे धडे मिळतात तसे धडे प ने बस मध्ये दिले,,, (हनीमून मध्ये शाळा होणार अस दिसत होत... आणि तसं झालं पण)आम्ही आरामात येण्याचं एक कारण म्हणजे..... ज्या हॉटेल मध्ये राहतो तिकडेच जेवण आहे असं आम्हाला वाटलं>...फार फार तर आम्ही जाईपर्यंत लोक जेवायला सुरुवात करतील....पण आमचं जेवायला जायचं हॉटेल राहण्याच्या हॉटेलपासून १ तास लांब होत..... म्हणजे आम्ही ५ मिनिटे उशीरा आलो.... तर इतर लोकांचा वेळ जाईल अस प चं म्हणणं होतं..... पण सकाळ संध्याकाळ जेवायला जायला १ आणि परत यायला १तास फुकट जातोय... हे त्यांना कळलं नाही,,, अखेर आम्ही जेवायला पोहोचलो.... जेवण चांगलं होत..... तेवढीच एक समाधानाची गोष्ट पहिल्या दिवशी मिळाली.... आणि आम्ही १ तासाचा प्रवास करून हॉटेल वर आराम करायला परतलो.....आणि बसमधून उतरताना परत ५.३० ला भेटायचं असं आम्हाला सांगितलं......
पत्तया मध्ये "अल्कझार शो"नावाचा प्रसिद्ध कॅब्रे आहे... तो पाहायला आम्ही गेलो..... अनेक सुंदर सेट्स उभे करून सुंदर थाई स्त्रियांनी नृत्य सादर केले..... हि त्या दिवसातली दुसरी आनंदाची गोष्ट होती की हा शो सुंदर होता.. शो संपल्यावर फी ने सांगितले की ह्या शो मध्ये एकही स्त्री नाहीये....???????? काय????????हा मोठा धक्का होता.... थायलंड मध्ये ६०% स्त्रिया आणि ४०% पुरुष जनसंख्या आहे त्यात ५% पुरुषांनी आपले लिंग बदलून घेतले आहे..... हे सगळे "लेडी बॉइज" ह्या शो मध्ये काम करतात.... म्हणजे.... त्या समस्त सुंदर स्त्रिया ह्या खय्रा स्त्रिया नव्हत्याच......
ह्यानंतर आम्ही बस मध्ये बसलो आणि कळले की परत एक तासाचा प्रवास करून जेवायला जायचं आहे..... ७ वाजले होते... ८ वाजता जेवायचं?? घरी आई पण नाही जेवायला लावत इतक्या लवकर....पण आम्ही लग्न करून एका शाळेत प्रवेश घेतला होता ना..... चला आता काय करणार???? ८ ते ९ ह्या वेळात जेवण करायचंच होतं.९ ला निघालो.... आणि १० ला हॉटेल मध्ये परत..... परत येताना बस मध्ये दुसय्रा दिवशी चे प्लॅन सांगितले..... आणि आम्ही आजपर्यंत आलेल्या अनुभवांपेक्षा जास्त हादरलो.....
पुढील भागात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: