शनिवार, २६ एप्रिल, २००८

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....

आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो
हाक आल्या क्षणाला, वेड्यासारखे धावलो
लोकांनी आपले सगळी, कामं साधून घेतली
आणि आपल्या वेळेला मात्र, सहज पाठ फिरवली
झगडत राहिलो, लढत राहिलो, त्यांच्यासाठी करत राहिलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...

तूच रे तूच, कायम आपला दोस्त
तुझ्यासोबत मित्रा आपण, दंग आयुष्यात मस्त
शब्दांमधून प्रेम आणि, पाठीवर एक थाप फक्त
प्रसंग आला की सगळ्यांचं प्रेम, वाऱ्यासोबत उडून जातं
आपण त्यांच्या साथीसाठी, वाट कायम पाहत राहतो
मनामध्ये कल्पनांचे, अनेक मनोरे बांधत राहतो
एका क्षणाला वाटतं मग, आपण खरंच फसलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...

असल्याक्षणी आपल्या वाट्याला , फक्त मनस्ताप येतो
विचारांचा अवास्तव गोंधळ, मनामध्ये माजतो
आपले मित्र म्हणता म्हणता, सगळेच काम साधतात
वेळ सरली की सहज, आपल्याला बाजूला सारतात
मग वाटत राहतं "आपण का नाही असे कधी वागलो?"
हिशोबांच्या या दुनियेत, इतके बेहिशोबी ठरलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो....

मित्र मित्र म्हणणारे, सिगारेटच्या धुरासोबत उडून जातात
ओंजळीतल्या वाळूसारखे, नकळत निसटून जातात
मग विचार येतो मनात, आपण नक्की काय केलं
भरल्या आपल्या ओंजळीत, काहीच कसं नाही राहिलं
सुखाच्या सगळ्या क्षणांत फक्त, आठवण बनून साठलो
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो...

मग थोडासा प्रयत्न होतो, इतरांसारखं वागायचा
लोकांच्या सवयीप्रमाणे, आपलं आयुष्य जगायचं
खरं काय खोटं काय, कळेनासं होतं मग
नसलेल्या गोष्टी करता करता, आपणच हरवतो
नाद सोडायचा ह्या सगळ्याचा, निदान स्वतःच्या नजरेत तरी नाही उतरलो
पण आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....
आपण साले आयुष्यभर, मूर्खच राहिलो.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: