बुधवार, १८ मार्च, २००९

भाव असाच समजुदे, स्पर्शाला स्पर्शाचा!!!

किती पटकन म्हणतोस तू
मला तुला मिठीत घ्यायचंय


अश्या ठिकाणी भेटायचंय...
कोवळ्या रानफुलांच्या जागी
हळुवारपणे स्पर्शायचंय
अन कशा कशाचं बंधन न पाळता
तुला घट्ट कवेत घेउन बसायचंय...
किती अवघड जातं मला
जेव्हा ह्या प्रश्नाला उत्तर मागतोस
माझ्या सगळ्या म्हणण्यावर
तुला काय वाटतं? असं विचारतोस...
कसं सांगायचं तुला
काय येतं माझ्या मनात!!
सांगण्याचा प्रयत्न केला तरी
लाज येते आडवी शब्दात...
मनामधलं सगळं काही
ओठांवर येउन अडून राहतं
पण तुझ्या स्पर्शाचं फुल मात्र
क्षणोक्षणी खुलत असतं...
कल्पनाही एवढी सुंदर असते
अश्या क्षणांना जाणवतं
तुझ्या जवळ असण्याचं
अजून एक स्वप्न जागं होतं...
माझ्या सगळ्या स्वप्नांचं
सगळं श्रेय तुला
अंतरीचा प्रत्येक भाव
फक्त तुझ्या असण्याचा
माझा प्रत्येक श्वास
फक्त तुझ्या प्रेमाचा
अन आयुष्याचा प्रत्येक क्षण
फक्त तुझ्या हक्काचा...
सगळं सांगायला कशाला रे
आधार हवा शब्दांचा?
जपू दे जरा हळुवारपणा
या क्षणाला क्षणांचा
काहीच बोलू नकोस
फक्त जवळ राहा
भाव असाच समजुदे
स्पर्शाला स्पर्शाचा!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: